पुणे : दापोडी येथील खोदकामात 11 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तो़डल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, की दापोडी येथील गणेशनगरमध्ये गुरुवारी (दि. 19 ) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरु असलेल्या खोदकामात रात्री 10.15 वाजता महावितरणची 11 केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे 36 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. दापोडीचे सहाय्यक अभियंता श्री. मंगेश सोनवणे व जनमित्रांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरु केली व 28 रोहित्रांवरील वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरळीत केला. उर्वरित 8 रोहित्रांवरील सुमारे 1200 वीजग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तुटलेली वीजवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले. वीजवाहिनीला दोन ठिकाणी जॅाईंट दिल्यानंतर रात्री 12.15 वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला.
गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे 1200 ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.