पुणे : धर्मांतराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज जेम्स देवनूर यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी १२ ऑगस्ट रोजी हा आदेश दिला.
न्यायालयाने प्राथमिक निरीक्षण नोंदवताना संबंधित कार्यक्रम हा ख्रिश्चन समुदायाचा सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचे दिसून येत असून, कार्यक्रमात इतर धर्मीयांना धर्मांतराच्या उद्देशाने बोलावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे नमूद केले. तसेच संबंधित कायद्यातील कलम ३, ९ आणि ११ मधील आवश्यक बाबी प्रथमदर्शनी पूर्ण झाल्याचे किंवा त्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नसल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
देवनूर यांना एक लाख रुपयांच्या पी.आर. व श्युअरिटी बाँडवर हंगामी अटकपूर्व जामीन देण्यात आला असून, तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित राहण्यासह काही अटी घालण्यात आल्या आहेत. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २५ ऑगस्ट २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.
देवनूर यांच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. रुपाली पाटील-ठोंबरे आणि अॅड. सुजित दराडे यांनी काम पाहिले.

