पुणे, दि. ३: प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षांसाठी मंजूर केलेली भाडेवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागासाठी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे.
तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांमधून प्रवाशांसोबत नेण्यात येणाऱ्या सामानासाठी ६० x ४० सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रुपये शुल्क आकारण्यास अनुमती देण्यात आली आहे.
ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवासी व चालकांच्या सोयीसाठी सुधारित भाड्यानुसार तात्पुरते टॅरिफ कार्ड तयार करण्यात आले असून, त्याची वैधता २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार आहे. त्यानंतर टॅरिफ कार्डचा वापर करता येणार नसून प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडे स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.
ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून अलंकार पोलिस स्टेशनसमोर, कर्वेनगर, इऑन पार्क जवळ खराडी पोलिस चौकीसमोर तसेच दिवे येथे चाचणी मैदान येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविली आहे.
००००

