नागपूर -प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातून उत्पादित होणारी ९४ टक्के दारू एकट्या चंद्रपुरात विकली जाते. तिथे दारूबंदी लागू केल्यास कारखाना डबघाईस येईल. त्यामुळे चंद्रपूर दारूबंदी रद्द करावी, अशी विनंती करणारी विशेष अनुमती याचिका राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियंत्रणातील कारखान्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे चंद्रपूर दारूबंदीला केवळ स्थानिकांचाच विरोध नसून मातब्बर राजकारणीही त्यात सहभागी असल्याचे स्पष्ट हेते.
श्रमिक एल्गारच्या संस्थापिक व दारूबंदी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पारोमिता गोस्वामी यांनी हा गौप्यस्फोट केला. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी पारोमिता गोस्वामी आंदोलन करीत आहेत. तर त्या दारूमुक्तीला आशियातील सर्वात पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणाऱ्या विखे पाटलांकडून विरोध होत आहे. हा कारखाना प्रवरानगर येथे विखे पाटील यांनी १९४८ मध्ये स्थापन केला होता. काँग्रेस पक्षातील मातब्बर नेतृत्व म्हणून विखे पाटील कुटुंबीयांकडे बघण्यात येते.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रवरानगरातील साखर कारखान्याचे उद्घाटन केले होते. सध्या विखे पाटील कुटुंबीयातील चौथी पिढी कारखाना चालवित आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बराच काळ या कारखान्याचे संचालन केले होते. तर सध्या डॉ. सुजय हे कारखान्याच्या संचालक मंडळावर आहेत.
दरम्यान, चंद्रपूर दारूमुक्तीला न्यायालयात आव्हान देणारा दारू कारखाना काँग्रेसच्याच नेत्याकडून नियंत्रित होत आहे. तसेच पक्षातील नेतेच लोकहिताच्या निर्णयाला विरोध करीत असल्याची तक्रारवजा पत्र पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे. कारखान्यातील तब्बल ९५ टक्के दारू चंद्रपुरात विकून सामान्य नागरिकांचे जीवन नेस्तनाबूत करण्याचा हक्क काँग्रेस नेते गाजवित आहेत, असा आरोपही पत्रात केला आहे.
कारखान्याने याचिकेतच नमूद केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात एकूण उत्पादित ५५ लाख केसेसपैकी ५२.४ लाख केसेस या केवळ चंद्रपुरात विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रॉकेट नावाने ओळखल्या जाणारा दारूचा ब्रॅन्डने तिथे एकाधिकार स्थापन केला आहे. चार वर्षातील दारू विक्रीतून कारखान्याला ७०४ कोटींचा फायदा झाल्याचेही याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांचे आर्थिक शोषण कारखान्याद्वारे होत असल्याचा आरोप पारोमिता गोस्वामी यांनी केला.
चंद्रपूर दारूबंदीला विखे-पाटलांचा विरोध
Date: