पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांना नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) संस्थेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी निवेदन सादर केले.
पुणे जिल्ह्यातील झेड एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि या कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले अस्लम कोठाळी यांना दिनांक २१ मार्च २०१८ रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ते कामावरून घराकडे परतत असताना ५ – ६ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर रुग्णालयात उपचार घेत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सातत्याने अशाप्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने कंपन्यांतून काम करणाऱ्यांच्या कुटुंबियांनाही काळजी वाटू लागली आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी कामगार मंत्र्याना हे निवेदन सादर करण्यात आले.
तसेच पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनाही एनआयपीएम तर्फे या घटनेशी
संबंधित दोषींवर त्वरित कारवाई करावी यासाठीचे निवेदन सादर करण्यात आले.
याशिवाय येत्या बुधवारी २८ मार्च रोजी एनआयपीएम व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एन्ड इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे एमसीसीआयएच्या सभागृहात संध्याकाळी ६ वाजता निषेध सभा व अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील याविषयी बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे मनुष्यबळ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.