- युपीएससीच्या परीक्षेसाठी दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
- आज कमला नेहरूत लसीकरण
- महापौर मोहोळ यांच्या पुढाकारातून विशेष मोहीम
पुणे (प्रतिनिधी)-पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. जगभरातील विविध भागांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्याकरीता पुणे शहरात वास्तव्य करतात, याचाच विचार करुन केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या परीक्षेच्या पूर्व सराव परीक्षेला दिल्ली येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम आज राबविण्यात येत आहे. कमला नेहरु रुग्णालयात सकाळी १० ते सायं ५ या वेळेत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
युपीएससीची पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे तसेच पुणे शहरातील बहुसंख्य विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरले आहेत. हे विद्यार्थी पुणे शहरातून दिल्लीत जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना दिल्लीत परीक्षेसाठी जाताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच त्यांचे लसीकरण सुलभरित्या व्हावे यासाठी महापौर यांच्या पुढाकाने हे लसीकरण आज (बुधवारी) पुणे महापालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटल येथे पाचवा मजला येथे सकाळी १०.०० (दहा ) ते सांयकाळी ०५.००(पाच) वाजता या वेळेत लसीकरण मोहिम आयोजित केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परीक्षेसाठी पात्र असल्याचे योग्य कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘लसीकरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोईचे होईल, तसेच कोव्हिड-१९ च्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या बाधित होण्याचा धोका कमी होईल. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकतील. या भावनेतून आपण ही लसीकरण मोहीम राबवत आहोत. या विशेष मोहिमेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, हे आवाहन’.