पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत इन्फोसीस संघाने गतवर्षीच्या टीसीएस संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेच्या 16 मौसमांपैकी 6 विजेतेपदे इन्फोसीस संघाने पटकावली आहेत.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या विजेतेपदाच्या लढतीत मकरंद ढमाळेच्या दमदार 61 धावांच्या बळावर इन्फोसीस संघाने टीसीएस संघाचा 40 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेतील सहावे विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना इन्फोसीस संघाने 20 षटकात 8 बाद 161 धावा केल्या. यात मकरंद ढमाळेने 61, संदिप सांघाईने 29 व गौरव बाबेलने 28 धावा केल्या. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धृव सोलंकी व आनंद कोंडा यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टीसीएस संघ 20 षटकात 8 बाद 121 धावांत गारद झाला. मयंक जासोरेने व निकुंज अगरवालने 28 धावा करून संघाचा डावाला आकार दिला. इन्फोसीस संघाच्या धृव सोलंकी व आनंद कोंडा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. 48 चेंडूत 61 धावा करणारा मकरंद ढमाळे सामनावीर ठरला.
स्पर्धेतेली विजेत्या इन्फोसीस संघाला 60 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या टीसीएस संघाला 40 हजार रूपये व करंडक, मालीकावीर संदिप सांघाईला 10 हजार रूपये तर सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलांदाज यांना प्रत्येकी 5 हजार रूपये अशी अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचे माजी क्रिकेटपटू व भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयडीयाज् अ सास कंपनीचे संचालक प्रशांत केएस, अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज् अ सास कंपनीचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज् अ सास कंपनीच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
इन्फोसीस – 20 षटकात 8 बाद 161 धावा(मकरंद ढमाळे 61 (48), संदिप सांघाई 29 (21), गौरव बाबेल 28 (24), सुनिल बाबर 2/26 , तेजपाल सिंग चिरागीया 2/27) वि.वि टीसीएस – 20 षटकात 8 बाद 121 धावा(मयंक जासोरे 22 (12), निकुंज अगरवाल 28 (19), अभिनव कालिया नाबाद 21(14), धृव सोलंकी 3/10 , आनंद कोंडा 3/25) सामनावीर- मकरंद ढमाळे
इन्फोसीस संघाने 40 धावांनी सामना जिंकला.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट फलंदाज– मकरंद ढमाळे(इन्फोसीस)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज– अभिनव कालिया (टीसीएस)
मालीकावीर– संदिप सांघाई(इन्फोसीस)