मुंबई-शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन नावांचा प्रस्ताव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दिला आहे. यातील एका नावाने उद्धव ठाकरेंचा गट अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवेल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने नवीन चिन्हांची यादी सादर केली असून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल अशी ती तीन चिन्ह आहेत.
उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानुसार, ठाकरे गटाने पक्षाचे नवीन नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाला पहिली पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या पसंतीचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे सुचवण्यात आले आहे. तसेच, निवडणूक चिन्ह म्हणून त्रिशूळ या चिन्हांवर प्रथम तर उगवता सूर्य या नावावर दुसरा दावा केला आहे.