केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद; वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सेवाभावी उपक्रम राबविला. केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत संकलित केलेले ५ हजार किलो धान्य आणि दोन लाख रुपयांचा सेवानिधी मानकर यांनी मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केला.वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चा ऐवजी समाजातील गरजू घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने मानकर यांनी हा उपक्रम राबविला.वाढदिवस हा केवळ औपचारिक सोहळा न राहता समाजातील गरजूंसाठी लोकोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा आपला नेहमीच मानस असतो. सामाजिक बांधिलकीचा हा वसा दरवर्षी कायम ठेवणार असल्याचा संकल्पही नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
या कार्यक्रमादरम्यान मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रभागातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत विजय मरळ यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी भाजप नेते प्रदीप कंद, संदीप भोंडवे, नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेविका स्वप्नाली पंडित, मंडल सरचिटणीस निलेश कदम, संतोष फडतरे, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, राजाभाऊ कासूर्डे, सुनील देसाई, धनंजय मरळ, सागर दहीभाते, अमर शाह, चेतन शाह यांच्यासह प्रभागातील नागरिक, व्यापारी बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाढदिवसाच्या निमित्ताने बळीराजाच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश दिला.

