पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तपासाचा आढावा घेतला. संबंधित प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, तसेच फरार आरोपींना तातडीने अटक करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
‘कारवाई अशी करा, पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे,’ अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.
न्यायालयाच्या आवारातील हल्ल्याने पुण्यात खळबळ
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात बुधवारी सहा ते सात जणांच्या टोळक्याने मंदार किवळे (वय ३५) याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाला. न्यायालयाच्या आवारातच घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह न्यायालय परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नऊ जण ताब्यात; सहा आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी सहा आरोपींना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्या न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य दोन संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, एक जण विधिसंघर्षग्रस्त बालक आहे.
गुन्हे शाखेकडे तपासाची सूत्रे; आरोपींवर मोक्का लावण्याची तयारी
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. हल्ल्यामागे पूर्ववैमनस्यासोबतच संघटित गुन्हेगारीचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असून, संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
वर्षभरापूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला?
वर्षभरापूर्वी जमिनीच्या वादातून कात्रज परिसरात शुभम चव्हाण याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्याची शपथ संशयितांनी घेतली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. याच पूर्ववैमनस्यातून मंदार किवळे याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
हल्ल्यापूर्वी रचला होता कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार किवळे १८ नोव्हेंबर रोजी जामिनावर सुटला होता. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी संशयितांनी कात्रज परिसरात बैठक घेऊन पूर्वनियोजित कट रचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कटातील अक्षय चव्हाण याच्या कथित भूमिकेसह अन्य संशयितांच्या सहभागाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याने आता फरार आरोपींच्या अटकेसह मोक्काअंतर्गत होणाऱ्या संभाव्य कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

