पुणे, ता. २२ : पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प निर्माण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. हडपसरपासून २० किलोमीटर अंतरावरील पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. अनेक मोहिमा यशस्वी केल्या. प्रजाहितदक्ष राजा अशी त्यांची ओळख होती. संभाजी महाराजांचे अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे गुण विशेष होते. त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्याचे यथोचित स्मरण व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पुरंदर किल्यावर भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
वित्तीय समितीला स्थगिती
: महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली वित्तीय समिती स्थगित करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज दिले.
रासने म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात येणार आहे. तसेच सर्व नगरसेवकांना स यादीतील ३० टक्के निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पुढील आठ दिवसांत करण्यात येणार आहे.’
घोले रस्त्यावर होणार राज्यातील पहिली सिटी लायब्ररी
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील महापालिकेची पहिली सिटी लायब्ररी उभारण्यासाठी स्थायी समितीने सुमारे ६ कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘घोले रस्त्यावर महापालिकेचे महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारत आहे. सुमारे बावीसशे चौरस मीटर क्षेत्रफळावरील ही इमारत खूप जुनी झाली असून, मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन प्रशस्त इमारतीत सिटी लायब्ररी निमार्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे सुरूवातीपासून पाठपुरावा करीत आहेत.’
रासने पुढे म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. शहरातील आणि राज्यातील लाखो युवक विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बॅंकिंगच्या परीक्षांचा अभ्यास करणार्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्याची गरज असते. हे साहित्य पारंपरिक ग्रंथालयातील पुस्तकांच्या स्वरूपात आणि आधुनिक डिजिटल ग्रंथालयाच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका वेळी एक हजार विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे.’