पुणे- जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील ज्योत्सना विठ्ठल वायकर(वय३४) या महिलेने चौदा नंबर (ता. जुन्नर) येथील श्री रुग्णालयात गेल्या सोमवारी सकाळी तीळ्या बाळांना जन्म दिला असून, बालके व माता सुखरूप असल्याची माहिती श्री हॉस्पिटलचे डॉ. अविनाश पोथरकर यांनी दिली. यापूर्वीही ज्योत्सना वायकर यांनी पाच वर्षांपुर्वी जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मुल होऊ शकत नाही असे डॉक्टरांनी सांगितल्या नंतर त्यांनी चौदा नंबर येथील श्री.हॉस्पिटलच्या डाॅ.मुक्तांजली पोथरकर व डॉ. अविनाश पोथरकर यांच्याकडे होमिओपॅथीचे उपचार सुरु केले. ज्योत्स्ना वायकर यांना बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी तीन बाळांना जन्म दिला.त्यांना चार मिनिटांच्या अंतरात एक मुलगी व दोन मुलगे झाले.यात मोठ्या मुलाचं वजन अडीज किलो,मुलीच वजन दोन किलो तीनशे ग्राम व तिसऱ्या मुलाचं वजन दोन किलो दोनशे ग्राम आहे. डॉ. पोथरकर यांच्या सोबतच जुन्नर येथील शिंगोटे हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डाॅ. प्रसाद शिंगोटे, ज्योती मुळे, भुलतज्ञ डाॅ.मोनाली शिंगोटे व आळेफाटा येथील बालरोग तज्ञ डाॅ.सतीश कजबे यांनी विशेष काळजी घेतली.