पुणे, ता. २२ : वैकुंठ स्मशानभूमीत शवदहनामुळे निर्माण होणार्या धुरातून प्रदूषणाची आणि परिसरीतील हवेच्या गुणवत्तेची त्रयस्थपणे तपासणी करण्यासाठी नागपूरच्या ‘नॅशनल एन्व्हारमेंटल इंजिनीअरिंग रीसर्च इन्स्टिट्यूट’ (नीरि) या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘वैकुंठ स्मशानभूमीत शवदहनासाठी तीन विद्युत दाहिन्या, एक गॅस दाहिनी आणि लाकडावर अंत्यसंस्कारासाठी सहा वूड पायर पद्धतीच्या चार शेड कार्यन्वित आहेत. या दाहिन्या आणि चार शेडमधून बाहेर पडणार्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्वतंत्र स्क्रबर आणि ब्लोअर यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या धुरावर प्रक्रिया करून तो ३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या चिमणीमधून हवेमध्ये सोडण्यात येतो.’
रासने पुढे म्हणाले, ‘या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते अशा तक्रारी या परिसरातील रहिवाश्यांनी महापालिकेकडे लेखी स्वरूपात आणि पीएमसी पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दावा दाखल केला असून, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.’
रासने पुढे म्हणाले, ‘या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणांची ‘नीरि’ या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या माध्यमातून त्रयस्थपणे तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील सहा महिन्यांत महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून सद्यस्थिती समजावून घेणे, जागा पाहाणी करणे, स्मशानभुमीतून बाहेर पडणारा धूर आणि हवेची गुणवत्ता तपासणे, त्याद्वारे सध्याच्या यंत्रणेचे विश्लेषण करणे आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा करणे असे कामाचे स्वरूप राहणार आहे.’
श्वानदंश लस खरेदीसाठी मान्यता
महापालिका आरोग्य विभागाच्या सर्व दवाखाने, रुग्णालये आणि प्रसुतिगृहांसाठी श्वानदंशावरील लस खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ‘प्रत्येक लसीसाठी रुपये २८१ इतका दर निश्चित करण्यात आला आहे. लस खरेदी करण्यासाठी एकूण ७२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेच्या गाडीखाना येथील मध्यवर्ती औषध भांडाराच्या माध्यमातून दवाखान्यांच्या मागणीनुसार लस खरेदी केली जाणार आहे.