पुणे, दि. 14 एप्रिल : लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या लोकसेवा ई-स्कूल पाषाण आणि फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल, लोकसेवा फार्मसी कॉलेज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी त्यांच्या घरुन या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभागी होतात. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि घरी असताना त्यांचा दिनक्रम कायम राहावा यासाठी या ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याची माहिती संबंधीत प्राचार्यांनी दिली.
झूम क्लाऊड अपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉगिंग आयडी दिला जातो आणि एका ठराविक वेळेत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वर्ग भरतो. यामध्ये प्राध्यापक संबंधीत विषय शिकवतात आणि विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर, ते थेट प्रश्न विचारतात. यासोबतच विद्यार्थ्यांना होमवर्क व असायन्मेंट्स दिल्या जातात. तेदेखील ऑनलाईन पाठविले जाते. व्हॉट्सअप व ईमेलचा यासाठी वापर केला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे साहित्यदेखील ऑनलाईनच पाठविले जाते, अशी माहिती लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक विभागाच्या संचालिका निवेदिता मडकीकर, लोकसेवा ई-स्कूलचे प्राचार्य डॉ. राजीव सेनगुप्ता, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी शुक्ला, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्रा. नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती आरडे यांनी दिली.
लोकसेवा ई-स्कूलमध्ये सर्व वर्गांचे ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास होत असून लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेत नववी व दहावीच्या वर्गांचे व्हर्च्युअल क्लासेस होत आहेत. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिलने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन मार्गदर्शन केले जात आहे.