मुंबई- – आजच्याच दिवशी १९७१च्या युद्धावेळी पाकिस्तानच्या तब्बल ९३ हजार सैनिकांनी भारतीय सैन्याचा पराक्रम पाहून शरणागती पत्करली होती आणि भारताचा विजय झाला होता. त्यामुळे आजचा १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येते. आज ४९ वा विजय दिवसाच्या निमित्ताने निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सैनिक फेडरेशनतर्फे शिवाजी मंदिर दादर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या बहादूर सैनिकांना नमन आणि सर्व जवानांना विजय दिनाच्या हार्दीक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विजय दिवस साजरा केला. निवृत्ती सैनिकांच्या ज्या समस्या असतील त्या सैनिकांच्या समस्येसाठी मी आपल्या पाठीशी आहे असेही दरेकर यांनी सांगितले.
यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबईचे अध्यक्ष सुभाष दरेकर यावेळी उपस्थित होते.
सैनिकांविषयी तज्ञ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खूप दिवस महत्वाचा आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आली, तेव्हा शत्रू देशाला सैनिकांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. सैनिकांचा सन्मान जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील सैनिकांना हिंम्मत आणि धैर्य देण्याचं काम त्यांनी केले. आपण जेव्हा आपला सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करत असतो, तेव्हा देशाचा सैनिक सीमेची रक्षा करत असतो. त्यांची पत्नी, मुले, आई संपूर्ण कुटुंब त्यांच्याशिवाय सण साजरा करतात. याप्रसंगी मी तुमच्या सोबत आहे अशी भावना व्यक्त करण्याचे काम पंतप्रधान मोदी नेहमी करत आहेत, असेही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
सैनिक आपली अनेक वर्ष देशाच्या सेवेसाठी देतो, परंतु निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण होतात. मुलांच्या शाळेचा प्रश्न, राहत्या घराचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न त्यादृष्टीने राज्य सरकारकडून कायमस्वरुपी योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार आणि फेडरेशन मिळून या योजना राबवण्याची गरज आहे. त्यामुळे निवृत्त सैनिकांच्या कल्याणासाठी ठोस गोष्टी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवृत्त सैनिकांसाठी मुंबईत कार्यालय झाले तर सैनिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, त्यांच्या विविध समस्यांना गती येईल असे सांगतानाच दरेकर यांनी आजच्या दिवसाच्या निमित्त आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली.
यावेळी सैन्यातील काही निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबईचे अध्यक्ष सुभाष दरेकर यावेळी उपस्थित होते.
४९ वा विजय दिनाच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते निवृत्त सैनिकांचा सन्मान
Date:

