पुणे . : ओंकारेश्वर मंदिराला सुवर्णजडीत कळस बसवण्यात आले असून, यानिमित्त कलशारोहणाचा कार्यक्रम आज ओंकारेश्वर मंदिर येथे पार पडला. करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री. विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते हा विधी भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती होती. या निमित्ताने सकाळी महाप्रसाद तर सायंकाळी प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पेशवेकालीन असलेल्या या पुरातन मंदिराची दुरावस्था झाली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू होते. “ या मंदिरात असलेल्या १७ पेशवेकालीन कळसांना सोन्याने मढवण्यात आले आहे. तसेच कळसावर असलेली नाजूक कलाकुसरही मूळ रूपात आणली आहे. यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला. नगरसेविका मुक्ता टिळक आणि नगरसेवक हेमंत रासने यांचेही सहकार्य यास लाभले त्यामुळे जिर्णोद्धाराचे काम जलद पूर्ण झाले.” असे मत देवस्थान समितीचे कार्यकारी विश्वस्त धानोत्तम लोणकर यांनी व्यक्त केले. यावेळी श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गंगाधर लोणकर आदींसह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.