पुणे : वीजग्राहकांना पारदर्शक सेवा देण्यासोबतच शून्य थकबाकीचे ध्येय समोर ठेऊन शिस्तीत कामकाज करा. वीजग्राहकांशी सातत्याने संवाद व संपर्क ठेवा व वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले.
रास्तापेठ येथील सभागृहात सोमवारी (दि. 5) पुणे परिमंडलातील अभियंता, अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्र दिवाकर, राजेंद्र पवार, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. शिंदे म्हणाले, वीजग्राहकांच्या सेवेत कोणत्याही प्रकारे त्रुटी राहणार नाही, याची काळजी सदोदित घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी हेतुपुरस्सर किंवा निष्काळजीपणा आढळून येईल, तेथील अधिकारी, कर्मचार्यांविरुद्ध कठोर कारवाई निश्चितपणे होणार आहे. प्रशासकीय कामकाज गतीमान करून कोणतेही प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही कामासाठी मध्यस्थांना थारा देऊ नये. ग्राहक व ग्राहकहितालाच प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील वीजग्राहक सजग आहे. संवेदनशील आहे. त्यांना तत्पर व पारदर्शी सेवा देण्यासाठी महावितरणची बांधिलकी आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेले काम चोखपणे व प्रामाणिकपणे पार पाडावे. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन चांगली सेवा द्या. देयके भरण्यासाठी तेथील ग्राहकांची मानसिकता तयार करा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून पुणे परिमंडलात वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे शून्य थकबाकीच्या संकल्पनेनुसार काम करावे लागणार आहे. प्रत्येक महिना हा मार्चअखेर समजून वीजबिलांची व थकबाकीची वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात यावे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार संबंधीतांवर कारवाई करण्याची सूचना यावेळी मुख्य अभियंता श्री. एम.जी. शिंदे यांनी केली. या बैठकीत सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी आदींची उपस्थिती होती.