मठाच्या अन्नदान उपक्रमाचे कौतुक, गरजू विद्यार्थ्यांना शासनाने एक वेळचे संपूर्ण जेवण द्यावे अशी मागणी
पुणे (धनकवडी) | श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त धनकवडी येथील शंकर महाराज मठात शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी समाधी ट्रस्टचे विश्वस्त सतीश कोकाटे, सुरेंद्र वाईकर, गुरुदेव शंकर अभ्यंकर, सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर, जेहलम जोशी, धनंजय व सौ. ऐश्वर्या भावे आणि भाविक उपस्थित होते.
सुखदुःखाच्या प्रसंगी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी श्रद्धा मनाला आधार देते. शंकर महाराज आणि त्यांच्या गुरुपरंपरेला जातीभेद व सामाजिक भेदांच्या पलीकडे स्थान आहे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. अनेक वर्षांपासून आपण मठात येत असून, यापूर्वी आपल्या हस्ते प्रकाशित झालेली दैनंदिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्याचा योग आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
विद्यार्थ्यांना एक वेळचे संपूर्ण जेवण द्यावे
मा.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना खिचडी प्रसाद देण्याच्या मठाच्या उपक्रमाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. मठाकडून नियमित खिचडी मिळते, असे विद्यार्थ्यांनी भेटीत सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. मठाच्या अन्नदान उपक्रमाला पूरक म्हणून शासनाने गरजू विद्यार्थ्यांना एक वेळचे पोटभर जेवण उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.
धार्मिक संस्थांची संपत्ती आणि सेवाकार्य जपण्याची जबाबदारी विश्वस्त व भाविकांवर असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि इतर देवस्थानांच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला. केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते गुरुदेव शंकर अभ्यंकर लिखित शंकर रामायणच्या पहिल्या पाच खंडांचे प्रकाशन झाल्याचा संदर्भ देत त्यांनी अभ्यंकर यांच्या कार्याचा गौरव केला.
१७ नोव्हेंबरला पालखी सोहळा आणि रक्तदान शिबिर
ट्रस्टच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, प्रकटदिन सोहळा १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान होत असून या काळात समाधी दर्शन २४ तास खुले आहे. मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता अभिषेक व महापूजा, सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत रक्तदान शिबिर, दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत पालखी सोहळा आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

