“महापालिकेचे कर्मचारी बसवून कंत्राटदारांचे उखळ पांढरे केले जात आहे”; उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांचा आरोप
पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत झाडण कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्याच्या सुमारे 45 कोटी रुपयांच्या कामावर माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. हे टेंडर संपूर्णपणे बोगस असून महापालिकेच्या विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाविना ठेवून कंत्राटदारांना फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्यबळ पुरवण्याचे हे काम उपायुक्त किंवा वॉर्ड ऑफिसर स्तरावर बदलण्यात आले आणि त्याला “प्रायोगिक तत्त्व” असे नाव देण्यात आले. मात्र या प्रायोगिक व्यवस्थेची किंमत तब्बल 45 कोटी रुपये असून, पुणेकरांच्या कराच्या पैशाचा अशा प्रकारे वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठविल्याचा दावा केसकर यांनी केला. त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनीही हे प्रकरण अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) यांच्याकडे पाठविले. त्यानंतर झाडण कामाच्या हद्दी, साफसफाई, खाजगी सोसायट्यांतील रस्ते आणि कर्मचाऱ्यांची हजेरी यांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र हा सर्व आढावा टेंडर प्रक्रिया आणि खर्चापूर्वीच घेणे आवश्यक होते, अशी टीका करत केसकर म्हणाले की, “पुणेकरांचे पैसे झाडाला लागलेले नाहीत. दक्षता विभागाचा अभिप्राय आणि मुख्य लेखापरीक्षकांचा अहवाल असतानाही 45 कोटी रुपये प्रायोगिक तत्त्वावर खर्च करणे योग्य नाही.”
घनकचरा विभागातील अशा एकूण सहा विषयांमध्ये मनमानी, बेकायदेशीरता आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे विषय कंत्राटदारांच्या फायद्याचे असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले.
“संपूर्ण बोगस प्रकरण त्वरित बंद करा. संबंधितांचे काम थांबवा. अन्यथा उच्च न्यायालयात जावे लागेल. पुणेकरांची लूट होऊ देणार नाही,” असा इशारा उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी दिला आहे.

