सुयोग मित्र मंडळाचा उपक्रम
पुणे, ता. २० : गोखले नगर येथील सुयोग मित्र मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘भारतीय अवकाश मोहीम- अंतराळवीर व्हायचंय मला’ हा वैज्ञानिक देखावा सादर करण्यात आला आहे.
देशातील पहिले खासगी रॉकेट विक्रम १ पासून ते भारताच्या नियोजित मानवी चांद्रमोहिमेची माहिती देणारा हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
सामाजिक आणि देशभक्तीपर देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुयोग मित्र मंडळातर्फे यावर्षी इस्रोच्या अवकाश मोहिमा आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय तरुणांना असलेल्या संधींविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावर्षी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेल्या स्कायरूट कंपनीच्या विक्रम १ या रॉकेटची प्रतिकृती, इस्रोचा इतिहास, चांद्रयान १ ते चांद्रयान ३, मंगळयान, आदित्य एल १ मोहीम, आगामी शुक्रयान, भारताच्या नियोजित चांद्रमोहिमा, गगनयान या मानवी अवकाश मोहीमेसह भारतीय अंतरिक्ष स्टेशन यांविषयी देखाव्यात माहिती देण्यात आली आहे.
इस्रोच्या मोहिमांची नेमकी माहिती देणारे फलक, सोप्या भाषेतील निवेदन आणि चांद्रयानाच्या उड्डाणाचे हलते दृश्य हे या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. विक्रम १ रॉकेटच्या प्रतिकृतीसोबत, तसेच भारतीय अंतराळवीराच्या वेशात सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.
मुकेश खामकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. आशिष माने, शुभम वाईकर, मंगेश तडके, विश्वजीत भवारी, साईराज बढे, नील दगडे, संतोष चौधरी, साईराज शिर्सेकर, सार्थक धुमाळ, सार्थक नेटके, ऍरोन त्रिभुवन, सुयोग देखणे, ओमकार मापुसकर यांनी सजावट केली.

