महावितरणच्या ‘स्नेहसंमेलन व विशेष गौरव पुरस्कार सोहळा–२०२६’मध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाहन
पुणे, दि. २० सप्टेंबर २०२६ : महावितरणच्या दैनंदिन कामकाजासोबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपावी. विशेषतः लहान मुलांमध्ये विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेबाबत जनजागृती केल्यास त्याचा दूरगामी सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पेशवेपार्क उपविभागातील दत्तवाडी शाखेत आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सवानिमित्त स्नेहसंमेलन व विशेष गौरव पुरस्कार सोहळा–२०२६’ शनिवारी (दि. १९) उत्साहात पार पडला. यावेळी कर्मचारीहित, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानाबद्दल राजेंद्र पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महावितरणच्या विकासात प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या कार्यातून संस्थेच्या प्रगतीला हातभार लावावा, असे पवार यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थापत्य विभागाशी संबंधित आवश्यक कामे मार्गी लावण्यास मानव संसाधन विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वीज सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेबाबत अंध विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल डहाणूकर शाखेचे सहाय्यक अभियंता अतुल धांडोरे यांचा, तर भोसरी विभागात एकाच वेळी ५,३४५ विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल इंद्रायणीनगर शाखेचे सहाय्यक अभियंता विशाल नाईकनवरे यांचा राजेंद्र पवार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी ‘कर्मचारी आरोग्य सेवा गौरव’ पुरस्कार मेडी असिस्टचे अमित गायकवाड यांना, तर ‘स्वच्छता व सुशोभीकरणातील उत्कृष्टता गौरव’ पुरस्कार स्थापत्य विभागाला प्रदान करण्यात आला.
दरम्यान, जनमित्र महादेव चांगिरे आणि अय्युब देशमुख यांनी विद्युत धक्का अथवा संभाव्य धोका निर्माण झाल्यास ध्वनीच्या माध्यमातून इशारा देणारी अभिनव यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे प्रात्यक्षिकही कार्यक्रमात सादर करण्यात आले. या नवकल्पनेचे कौतुक करत आवश्यक तांत्रिक सुधारणांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन राजेंद्र पवार यांनी दिले.
कार्यक्रमास प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच आजी-माजी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

