ज्येष्ठ चालकांना १० हजारांचा सन्मान निधी; आरटीओतर्फे जनजागृती मोहीम
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ मार्फत राज्यातील प्रवासी वाहतूक चालकांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मंडळाच्या पात्र ज्येष्ठ सभासद चालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत असून, या योजनांची माहिती अधिकाधिक चालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यातर्फे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मंडळामार्फत ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी, कॅब, अॅपआधारित ओला-उबर वाहने तसेच पर्यटन वाहन चालकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य विमा व वैद्यकीय मदत, अपघाती विमा संरक्षण, तातडीची आर्थिक मदत, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच कौशल्यवृद्धी योजना यांचा समावेश आहे.
याशिवाय नवीन ऑटो रिक्षा किंवा मीटर टॅक्सी तसेच गृहखरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध असून, ६५ वर्षांवरील पात्र चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदानाची तरतूदही करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या आणि मंडळाचे सभासद असलेल्या पात्र चालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत आहे.
पात्र चालकांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. सभासदत्वासाठी नोंदणी व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये, असे एकूण ८०० रुपये शुल्क आहे. सभासदत्वासाठी अनुज्ञप्ती, बॅच, परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र चालकांनी मोठ्या संख्येने सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

