रस्ते, मिसिंग लिंक, भूसंपादन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा आढावा; प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांची पाहणी करून रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, भूसंपादन आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.
पाहणीदरम्यान वाघोली परिसरातील नाला गार्डन येथील विकासकामांची पाहणी करण्यात आली. पर्यावरणीय समतोल आणि शाश्वत परिसंस्था जपण्याच्या दृष्टीने नैसर्गिक घटकांचा योग्य वापर करून विकसित करण्यात आलेल्या या जागेचे महापालिका आयुक्तांनी कौतुक केले. महापालिकेच्या उपलब्ध जागांचा योग्य वापर करून नागरिकांसाठी अशाच प्रकारच्या हरित आणि मनोरंजनात्मक जागा विकसित करण्याच्या शक्यता तपासण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अशा हरित जागा शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी ‘शहराची फुफ्फुसे’ म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असेही आयुक्तांनी नमूद केले.
स्वच्छतेबाबतही घेतला आढावा
यावेळी परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी नियमित स्वच्छता राखण्यासोबतच परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा साचणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मिसिंग लिंक आणि प्रमुख रस्त्यांचा आढावा
नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध मिसिंग लिंक आणि प्रमुख रस्ते विकास प्रकल्पांचाही महापालिका आयुक्तांनी आढावा घेतला.
यामध्ये शिवणे–खराडी रस्त्यावरील नदीकाठच्या रस्त्याची मिसिंग लिंक, ग्रँट रोड–नगर रोड जंक्शनजवळील रस्ता रुंदीकरण, वडगावशेरी नदीकाठच्या रस्त्यावरील मिसिंग लिंक, वाघोली येथील प्रस्तावित १८ मीटर रुंदीच्या उत्तर-दक्षिण रस्त्याची मिसिंग लिंक तसेच नगर रोडच्या उत्तर व दक्षिण बाजूस समांतर असलेल्या प्रस्तावित प्रादेशिक योजना (RP) रस्त्यांचा समावेश होता.
हे प्रस्तावित रस्ते अंतर्गत पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरणार असून मेट्रो आणि मुख्य रस्त्यांच्या कामांदरम्यान वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील, असे सांगण्यात आले.
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश
काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प भूसंपादनाच्या अडचणींमुळे प्रलंबित असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या प्रमुख रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच इतर प्रस्तावित रस्त्यांची व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
नगर रोडचे काम अंतिम टप्प्यात
येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील रस्ते दुरुस्ती आणि देखभाल कामांचाही आढावा घेण्यात आला. नगर रोडच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाने दिली.
परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांची दुरुस्तीही प्राधान्याने हाती घेण्यात आली असून येत्या १५ दिवसांत प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले.
पाहणीवेळी उपायुक्त (परिमंडळ क्र. १) आशा राऊत, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, अधीक्षक अभियंता (पथ) रोहिदास गव्हाणे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

