गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी; प्रलंबित कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

Date:

खड्डे, फुटपाथ, चेंबर आणि खोदाईनंतरची कामे तातडीने पूर्ण करा; निकृष्ट कामांवर कंत्राटदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांवरील रस्ते, फुटपाथ, चेंबर आणि अन्य पायाभूत सुविधांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून पाहणी केली. मिरवणूक मार्गावरील प्रलंबित कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करून प्रत्येक कामाचा जिओ-टॅग्ड छायाचित्रांसह अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात महापौर, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त स्तरावर यापूर्वी बैठका घेण्यात आल्या होत्या. शहरातील खड्डे बुजविणे, चेंबर दुरुस्ती आणि विसर्जन मिरवणूक मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रत्यक्ष कामांची स्थिती तपासण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.

लक्ष्मी रोडसह प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी

बेलबाग चौक ते अलका टॉकीज, लक्ष्मी रोड, टिळक रोड, मंडई परिसर, केळकर रोड आणि कुमठेकर रोड या प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली.

काही ठिकाणी खड्डे, उंचसखल फुटपाथ, निघालेले ब्लॉक्स तसेच रस्त्याच्या पातळीपेक्षा वर किंवा खाली असलेली ड्रेनेज व पावसाळी चेंबरची झाकणे आढळून आली. ही सर्व कामे तातडीने पूर्ण करून फुटपाथ आणि रस्ते सुरक्षित व समतल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश

MSEDCL तसेच अन्य संस्थांकडून झालेल्या खोदाईनंतर रस्ते व फुटपाथ पूर्ववत करण्याचे काम मानक कार्यपद्धतीनुसार झाले नसेल, तर संबंधित संस्थांकडून ते तातडीने करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.

खोदाईनंतर रस्त्यावर किंवा फुटपाथवर पडलेली माती, मुरूम, खडी, बांधकाम साहित्य आणि अन्य अवशेष त्वरित हटवून नागरिकांसाठी रस्ता मोकळा करण्यास सांगण्यात आले.

खड्डे बुजविताना एजिंग कटिंग, योग्य भराव, कॉम्पॅक्शन आणि अंतिम पृष्ठभागाचे समतलीकरण ही संपूर्ण प्रक्रिया SOP प्रमाणे करण्याचे आदेशही देण्यात आले.

निकृष्ट कामांवर दंडात्मक कारवाई

निकृष्ट किंवा अपूर्ण कामे आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर करारातील अटी आणि प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश दिवटे यांनी दिले.

तसेच कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले.

DLP अंतर्गत कामे कंत्राटदारांकडून दुरुस्त करून घ्या

मागील वर्षी सायकल ग्रँड टूरअंतर्गत करण्यात आलेल्या फुटपाथ दुरुस्ती, रंगकाम आणि अन्य कामांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या संबंधित कंत्राटदारांकडून दोषदायित्व कालावधी (DLP) अंतर्गत तातडीने दुरुस्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.

विसर्जन मार्गावर धोकादायक स्थिती राहता कामा नये

विसर्जन मिरवणूक मार्गावर एकही खड्डा, नादुरुस्त फुटपाथ, उघडे किंवा उंचसखल चेंबर अथवा अन्य धोकादायक स्थिती राहणार नाही, याची संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि पथ विभागाने संयुक्तपणे खात्री करावी, असे दिवटे यांनी सांगितले.

यापुढील पाहणी दौऱ्यांमध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि वॉर्ड अभियंते अनिवार्यपणे उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या.

रस्त्यावर पाणी साचल्यास विकासकांवर जबाबदारी

खाजगी बांधकामांमुळे रस्त्यावर पाणी साचत असल्यास संबंधित विकासकांना तातडीने नोटीस देऊन कायमस्वरूपी पाणी निचऱ्याची व्यवस्था करून घ्यावी. पाणी साचल्यामुळे रस्ता किंवा फुटपाथ खराब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विकासकाची राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

परिसरातील बहुतांश रस्ते १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे असून मोठ्या पॅचची कामे मुख्य पथ विभागामार्फत, तर इतर कामे संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत सुरू आहेत. सहायक आयुक्त आणि झोनल उपायुक्तांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामे गुणवत्तापूर्ण व SOP प्रमाणे होत असल्याची खात्री करावी, असेही निर्देश देण्यात आले.

पाहणीवेळी प्र. मुख्य अभियंता राजेश बनकर, अधीक्षक अभियंता गव्हाणे, विश्रामबागवाडा विभागाचे उपअभियंता तसेच संबंधित वॉर्ड कार्यालयांचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

850 विद्यार्थ्यांनी घेतली एकाच छताखाली परदेशी शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी...

भगवान वराह जयंतीनिमित्त पुण्यात रविवारी भव्य मिरवणूक

पुणे : श्री भगवान वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज,...

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा...

सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची बाब नसून सामाजिक जबाबदारी...