अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष; हरिहर मंदिरात होणार प्राणप्रतिष्ठापना
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते हरिहर मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मिरवणुकीत समर्थ आणि तालचक्र ढोलपथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक आणि वाद्यपथके असणार आहेत.
भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकात्म स्वरूपाचे प्रतीक असलेल्या हरिहर संकल्पनेवर आधारित भव्य मंदिराची उभारणी मंडळाकडून करण्यात आली आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती, शिवपिंड तसेच शिव-विष्णूच्या समन्वयाचे दर्शन मंदिरातून होणार आहे.
*भव्य हरिहर मंदिरात विराजमान होणार शारदा गजानन* — तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर पूर्णपणे फायबरमध्ये साकारण्यात आले आहे. मंदिराची कलात्मक संकल्पना आणि निर्मिती कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर आणि गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
अण्णा थोरात म्हणाले, हरिहर मंदिराची संकल्पना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचा संदेश देणारी आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी, हा या देखाव्यामागील उद्देश आहे.

