“त्यांच्या संस्कारातून समाजसेवेची पिढी घडली; लाखो पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणाऱ्या कार्यामागे या मातेचे मोठे योगदान”
पुणे/नायगाव : आदिवासी आणि वंचित समाजासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या कुटुंबाला संस्कार आणि बळ देणाऱ्या कै. आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांच्या स्मृतींना नायगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी न्यायाधीश व लेखक डॉ. नामदेव चव्हाण यांनी कै. शेवराबाई भोसले आणि कै. ज्ञानदेव शिलेदार भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
कै. शेवराबाई भोसले यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाच्या सामाजिक संघर्षातील एका प्रेरणादायी मातृशक्तीची उणीव निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबाला आधार देत मुलांना शिक्षण आणि समाजसेवेचे संस्कार देणाऱ्या शेवराबाई यांच्या कार्याचा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
भोसले कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शेवराबाई यांनी आयुष्यभर अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलांना शिक्षण दिले आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. त्यांचा एक मुलगा साहित्यिक भास्कर भोसले शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी व आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांच्या न्यायासाठी काम केले आहे. तर पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले पीडित कुटुंबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत आहेत.
“आईने आयुष्यभर सोसलेला वनवास आणि केलेला त्याग हीच आमची खरी पुंजी आहे. दुःखाच्या या काळात गुरुजनांनी घरी येऊन दिलेला आधार हा आमच्यासाठी केवळ दिलासा नसून आईच्या कार्याला समाजाने दिलेली आदराची पावती आहे,” अशी भावना पत्रकार सुनील भोसले यांनी व्यक्त केली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. शेवराबाई भोसले यांच्या सामाजिक योगदानाची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली होती. त्यांना विविध संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी कै. ज्ञानदेव भोसले आणि कै. शेवराबाई भोसले यांच्या स्मृती जपण्यात आल्या आहेत. त्यांच्या संघर्षमय आयुष्याने आणि सामाजिक जाणिवेने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा वारसा निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. लक्ष्मी नामदेव चव्हाण, आकाश नामदेव चव्हाण, अनिल, सुनील, राजश्री, सुजाता, ग्रीष्म, सुरेखा, तुकाराम भोसले, नायगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अलका गायकवाड, बानूताई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

