धाराशिवहून पुण्यात आला होता शिक्षणासाठी; आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या पार्श्वभूमीवर टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नारायण पेठ परिसरात घडली. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रथमेश मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहत होता आणि MPSC परीक्षेची तयारी करत होता. गेल्या काही काळापासून तो आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
प्रथमेशने काही व्यक्तींकडून पैसे उधार घेतले होते. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. कर्जाची परतफेड तसेच पुण्यातील राहणीमानाचा खर्च भागवणे त्याच्यासाठी कठीण होत होते. त्याच्या खोलीचे भाडेही थकीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर त्याने पुणे सोडून गावी परत जाण्याचाही विचार केला होता.
सुसाईड नोट पोलिसांच्या हाती
घटनास्थळी पोलिसांना प्रथमेशने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि काही व्यक्तींकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
याप्रकरणी नारायण पेठ पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
प्रथमेशवर नेमके किती कर्ज होते, त्याने कोणाकडून पैसे घेतले होते तसेच या घटनेमागे अन्य कोणते कारण होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संबंधित व्यक्तींकडेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

