“मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा महत्त्वाचा”; ध्वनीप्रदूषणाला ‘सॉफ्ट हिंसाचार’ म्हणत उत्सवांच्या सध्याच्या स्वरूपावर पत्रकार परिषदेत प्रश्न
पुणे : डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात भूमिका मांडल्यानंतर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधातील आपला लढा थांबणार नसल्याचे सांगतानाच, रविवारी पुण्यात होणाऱ्या ‘डीजेमुक्ती’ मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारच्या मोर्चात सहभागी होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बापट यांनी, “मी जिवंत असेन आणि मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत असेन तर मोर्चात सहभागी होणार आहे,” असे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा संदर्भ देत आपल्या सुरक्षिततेबाबतही भाष्य केले. आपल्याला भीती वाटत नसली तरी केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपल्यावर टीका करणाऱ्यांनाही बापट यांनी उत्तर दिले. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत यापेक्षा आपण मांडत असलेला मुद्दा काय आहे, यावर तार्किक प्रतिवाद झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानी म्हटले जाते; मात्र एखाद्या व्यक्तीने विचार मांडल्यावर त्याच्यावर हल्ला होत असेल तर ही कोणती संस्कृती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उत्सव साजरे करण्याला आपला विरोध नसल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. मात्र ध्वनीप्रदूषण आणि रहदारीला होणारा अडथळा या दोन गोष्टी टाळून उत्सव साजरे केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे ध्वनीप्रदूषण हा एक प्रकारचा ‘सॉफ्ट हिंसाचार’ असल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत भाष्य करताना बापट यांनी नागरिकांना उत्सवच शिक्षा ठरत असल्याचे सांगितले. त्यांनी ‘उत्सवांची दहशत’ असा उल्लेख करत उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या अतिरेकावर टीका केली. याच संदर्भात त्यांनी ‘लष्कर-ए-उत्सव’ असा उल्लेख केला. सामान्य नागरिकांना या गोंगाटामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, उत्सवाचा मूळ उद्देश आनंद देण्याचा असताना त्याचे स्वरूप बदलत असल्याची टीका त्यांनी केली.
“मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत बापट यांनी व्यक्तिगत टीकेऐवजी आपल्या मुद्द्याला तार्किक उत्तर देण्याचे आवाहन केले.
ध्वनीप्रदूषणाविरोधातील हा विरोध एखाद्या उत्सवापुरता किंवा तात्पुरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या लढ्याला संघटनात्मक स्वरूप देण्याचा विचार सुरू असून, सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे बापट यांनी सांगितले.

