- महापौरांच्या निवासस्थानी रक्षा बंधनाचा अनोखा सोहळा
पुणे : रक्षाबंधनाचा धागा हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील विविध घटकांना परस्परांच्या विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्यात जोडणारा ठरावा, या उद्देशाने महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून महापौर निवासस्थानी ‘एक राखी, एक राष्ट्र, एक समाज’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा पार पडला. विविध जाती-पंथांतील नागरिकांसह तृतीयपंथीयांनीही या उपक्रमात सहभागी होत सामाजिक समरसतेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला.
समाजातील भेद, पूर्वग्रह आणि सामाजिक अंतर बाजूला ठेवून एकमेकांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली. या माध्यमातून ‘आपण सारे एक’ ही भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः तृतीयपंथीयांचा सहभाग हा या उपक्रमाच्या समावेशकतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या घटकांनाही समान सन्मान आणि आपलेपणाची वागणूक मिळणे आवश्यक असल्याचा संदेश या सहभागातून अधोरेखित झाला.
‘एक राखी’ सामाजिक ऐक्याचे, ‘एक राष्ट्र’ राष्ट्रीय एकात्मतेचे, तर ‘एक समाज’ परस्पर सन्मान आणि समरसतेचे प्रतीक ठरावे, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विविधतेतून एकता ही पुण्याच्या सामाजिक जीवनाची ताकद असून, परस्परांचे मत, ओळख आणि अस्तित्वाचा सन्मान करत एकत्र येणे हीच सामाजिक सलोख्याची खरी गरज असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “रक्षाबंधनाचा धागा केवळ दोन व्यक्तींना जोडत नाही, तर तो समाजातील माणुसकीचे नातेही घट्ट करू शकतो. जात, पंथ, भाषा किंवा सामाजिक स्तर यापलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान मिळणे आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सोपान काका चव्हाण, शिवसेनेचे गटनेते नितीन गावडे, काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे,
शिवसेनेचे किरण साळी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश पोहणेरकर, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक आणि विविध समुदायांतील व्यक्ती एकाच व्यासपीठावर येऊन रक्षाबंधन साजरे करत असल्याने कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक संवाद वाढविणे, परस्परांबद्दलचा आदर दृढ करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला समानतेने सामावून घेणे, हीच या उपक्रमाची मध्यवर्ती भावना होती.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने माणसामाणसांमधील नाती अधिक घट्ट करण्याचा आणि सामाजिक सलोख्याचा धागा मजबूत करण्याचा हा प्रयत्न ठरला.

