हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मतभेद असू शकतात, हिंसेचे समर्थन नाही’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानंतर बापटांना पोलीस संरक्षण — गणेश बिडकर
पुणे : डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना पुण्यात झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत “या झुंडशाहीची दहशत वेळीच मोडून काढा,” अशी मागणी केली आहे. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही मारहाणीचा निषेध करत संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगितले. पुणे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
विद्यानंद बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात सार्वजनिकपणे भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांच्याशी भर रस्त्यावर वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. या घटनेनंतर बापट फरासखाना पोलीस ठाण्यात गेले. घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले असून, नागरिकाला एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असताना त्याच्यावर अशा पद्धतीने हात उचलला जाणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी “विद्यानंद बापट कोणत्या धर्माचे आहेत?” असा सवाल उपस्थित करत, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या बापट यांच्यावर झालेली मारहाण महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि कायदा-सुव्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले आहे.
मतभेद असू शकतात, मात्र त्याचे उत्तर हिंसा असू शकत नाही, असे सांगत सपकाळ यांनी झुंडशाहीच्या मानसिकतेवर कठोर टीका केली. आपले मत मांडण्याचा अधिकारच हिरावून घेण्यासाठी झुंडशाहीचा आधार घेतला जात असेल, तर “हा महाराष्ट्र आहे की तालिबान?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कायद्याच्या राज्यात दहशत आणि झुंडशाहीला स्थान असता कामा नये. बापट यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. “महाराष्ट्रात संविधान आणि कायदा चालेल; झुंडशाही नाही,” अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, या घटनेवर व्यक्त झालेल्या आणखी एका राजकीय प्रतिक्रियेत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. डीजे बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या बापट यांना मारहाण होणे ही गंभीर आणि संतापजनक बाब असल्याचे सांगत, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात आणि हल्लेखोरांवर किती कठोर कारवाई होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
‘मतभेद असू शकतात, मात्र हिंसेचे समर्थन नाही’ — मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही बापट यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी मते असू शकतात. एखाद्याची भूमिका मान्य नसेल तर त्याला उत्तर संवादातून आणि वैचारिक भूमिकेतून देता येते; मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हात उचलणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात कडक कारवाई करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांशी आपले बोलणे झाल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली असून अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याचा बिडकरांचा दावा
पुणे महानगरपालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनीही या घटनेनंतर राज्याच्या गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काळात पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती बिडकर यांनी दिली.
हल्ल्याच्या घटनेनंतर सरकारकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत, असेही बिडकर यांनी सांगितले.
विद्यानंद बापट यांच्या मारहाण प्रकरणामुळे आता केवळ डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाच नव्हे, तर नागरिकांना सार्वजनिक प्रश्नांवर निर्भयपणे मत मांडता येणार का, हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मारहाणीचा निषेध करण्यात येत असताना, पोलिसांकडून पुढे नेमकी कोणती कारवाई केली जाते आणि बापट यांच्या सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

