१५ हजारांहून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवनदान देणारे तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे मार्गदर्शन; ‘मिशन झिरो स्नेकबाइट डेथ’वर भर
पुणे : सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचविणे शक्य असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्पदंशाची लक्षणे तातडीने ओळखून उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट (MSU) यांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी पुणे महापालिकेतील जुना जी. बी. हॉल येथे ‘सर्पदंश व्यवस्थापन’ या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १५ हजारांहून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवनदान देणारे डॉ. राऊत यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सर्पदंश हा विशेषतः शेतीशी संबंधित भागात होणारा गंभीर अपघात असला तरी, तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास गंभीर विषारी सर्पदंशाचा रुग्णही वाचू शकतो, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘मिशन झिरो स्नेकबाइट डेथ’ ही संकल्पना मांडली.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे २० ते ५० लाख सर्पदंशाच्या घटना घडतात आणि ६० हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनेही सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रुग्णाची वैद्यकीय लक्षणे अर्थात ‘Clinical Syndrome’ अचूकपणे ओळखणे, अँटी-स्नेक व्हेनम (ASV) कधी आणि किती प्रमाणात द्यावे, तसेच उपचारामध्ये ‘Rule of 10’ कसा वापरावा, याबाबत डॉ. राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य प्रोटोकॉलनुसार उपचार केल्यास सर्पदंशाच्या रुग्णाचा जीव वाचविण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्पदंशाच्या उपचारामध्ये अंधश्रद्धा हा मोठा अडसर असल्याचेही या प्रशिक्षणात अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे योग्य प्रबोधन करून रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे पुणे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या सर्पदंशाच्या रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येतील, असा विश्वास MSU च्या ऑफिसर इन्चार्ज तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण कार्यशाळेस पुणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि MSU स्टाफ असे एकूण ११८ जण उपस्थित होते.

