आनंदनगर परिसरात छापा; १२५ ग्रॅम मेफेड्रोनसह २५.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
पुणे : मार्केटयार्ड पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी कारवाई करत आनंदनगर वसाहत परिसरात छापा टाकून तब्बल १२५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या अमली पदार्थाची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय देशी-विदेशी दारू, तलवार, कुऱ्हाड, लोखंडी पाईप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार महिबूब नदाफ यांना २७ ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत आनंदनगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाजवळील एका घरात अवैध दारू तसेच अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले, पोलीस उपनिरीक्षक गडगडे आणि पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात पोलिसांना १२५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) मिळून आले. त्याची किंमत २५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सुमारे १० हजार ४०० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, एक तलवार, एक कुऱ्हाड, लोखंडी पाईप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी ओम कुंडलिक गायकवाड (वय २५, रा. आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड, पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायदा, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, शस्त्र कायदा तसेच अन्य संबंधित कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले यांच्या सूचनेनुसार मार्केटयार्ड पोलिसांच्या पथकाने केली.


