क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
बारामती, दि. २८ ऑगस्ट २०२६ : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी बारामती येथे सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाची पहाटे पाहणी केली.
यावेळी त्यांनी क्रीडा संकुलाच्या सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व यंत्रणांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. क्रीडा संकुल उभारणीचे काम दर्जेदार, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामती परिसरातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्थानिक आणि युवा खेळाडूंना सराव व स्पर्धांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी क्रीडा संकुलाचे काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले.
कामाची गती, गुणवत्ता आणि नियोजन यांचा सातत्याने आढावा घेऊन क्रीडा संकुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

