लोटस कोर्ट प्रकल्पातील ११० सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप; बिल्डर दाम्पत्यावर गुन्हा

Date:

सुविधा न दिल्याचा, मंजूर आराखड्यात बदल करून दोन अतिरिक्त मजले बांधल्याचा आरोप; पार्किंग आणि कागदपत्रांबाबतही तक्रार

पुणे : जुना खराडी-मुंढवा रस्त्यावरील ‘लोटस कोर्ट’ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मे. कृष्णा कन्स्ट्रक्शनच्या बिल्डर दाम्पत्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहप्रकल्पात आश्वासन दिलेल्या सुविधा न देणे, कागदपत्रे व संमतीपत्राचा कथित गैरवापर करणे, मंजूर आराखड्यात बदल करून दोन अतिरिक्त मजले बांधणे तसेच पार्किंगच्या जागेबाबत गैरप्रकार केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

मित्तल प्राणजीवन मिस्त्री (वय ५०) आणि शिखा मित्तल मिस्त्री (वय ४७, दोघे रा. कल्याणीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लोटस कोर्टमधील रहिवासी उमेश संदिपान मगर (वय ४२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ तसेच मोफा कायद्यातील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादीनुसार, मगर यांनी डिसेंबर २०१८ मध्ये लोटस कोर्टमधील ए-१०१ क्रमांकाचा ९२१.०७ चौरस फूट क्षेत्रफळाचा दोन बीएचके फ्लॅट पार्किंगसह ८० लाख ८६ हजार रुपयांना बुक केला होता. डिसेंबर २०२१ पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बँकेचे कर्ज आणि स्वतःची रक्कम मिळून त्यांनी ७८ लाख ८१ हजार ३४८ रुपये भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताबा मिळाला; पण सुविधा कुठे?

निर्धारित मुदतीत सदनिकेचा ताबा न मिळाल्यामुळे मगर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये संमतीपत्रावर स्वाक्षरी घेऊन त्यांना ताबा देण्यात आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

प्रकल्पाच्या ब्रोशरमध्ये स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, बास्केटबॉल कोर्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा आणि जनरेटर बॅकअप अशा विविध सुविधा देण्याचे आश्वासन होते. मात्र, या सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१५वा आणि १६वा मजला बांधल्याचाही आरोप

या प्रकरणातील गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे प्रकल्पातील सुमारे ११० सदनिकाधारकांची परवानगी न घेता मंजूर आराखड्यात बदल करून १५वा आणि १६वा असे दोन अतिरिक्त मजले बांधण्यात आल्याचा दावा. या मजल्यांवरील सदनिकांची विक्री करून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

पार्किंगबाबतही फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीला देण्यात आलेली १३.७५ चौरस मीटरची पार्किंग क्रमांक १ ही जागा पूर्णपणे न देता त्यातील निम्मी जागा ए-८०२ क्रमांकाच्या सदनिकाधारकाला देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ताबा दिल्यानंतर चार महिन्यांच्या आत कन्व्हेअन्स डीड, सोसायटी हँडओव्हर, ऑडिट रिपोर्ट आणि फायर एनओसी देणे अपेक्षित असताना ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचाही आरोप आहे.

कन्व्हेअन्स डीड आणि अन्य कागदपत्रांबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तसेच धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. अखेर त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बिल्डर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हंगामी स्थलांतरामुळे कोणत्याही मुलाचे बालपण हिरावले जाऊ नये – आयुष्मान खुराना

जालन्यात युनिसेफच्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ कार्यक्रमाला...

गणेशोत्सव, दहीहंडीत उत्साह हवा; पण ध्वनी प्रदूषणाची मर्यादा राखलीच पाहिजे

ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालकांचाही विचार करा; पोलीस आयुक्तांनी...