पुणे -आज शुक्रवारी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात ठिय्या आंदोलन केले.भाजपा नेत्यांवर आरोप -टीका करायची नाही अन्यथा आम्ही तुमचा निधी शून्य करून वार्डा वार्डात कोंडी करू,विकास कामे करू पण ती तुमच्या नाही आमच्याच मार्फत करू अशी भूमिका महापालिकेतील सभागृह नेत्यांनी घेतली आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकास निधी शून्य केल्याचा आरोप करत हा निषेध व्यक्त करण्यात आला.
स्थायी समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी कोथरूड मतदारसंघातील कामांची चौकशी करावी, असा प्रस्ताव दिला होता. यानंतर भाजपने दोन्ही नगरसेवकांचा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी रद्द केला. या कृतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते निलेश निकम, आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ नेते दीपक मानकर, शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे, दत्ता धनकवडे , वैशाली बनकर,राजलक्ष्मी भोसले, सुभाष जगताप,हर्षवर्धन मानकर, अमोल बालवडकर, सुहास टिंगरे, प्रिया गदादे,राकेश कामठे, गणेश कल्याणकर, शितल सावंत, सुरज लोखंडे, अजित घुले, स्वप्निल दुधाने, श्वेता घुले, स्मिता कोंढरे, हेमलता मगर,गौरव घुले, प्रतीक कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक सुहास टिंगरे यांनी सांगितले की, भाजपने त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करणे हा केवळ त्यांच्यावर अन्याय नाही, तर मतदारसंघातील नागरिकांच्या विकासाला खीळ घालण्यासारखे आहे. हा भाजपच्या बहुमताचा जनतेवरील अन्याय असून, जनतेची कामे आगामी काळात कशी मार्गी लागणार, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी मिळवून आता विकास कामे करावी लागतील, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी सांगितले कि बहुमताच्या जोरावर दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, बहुमतापेक्षा संविधान म्हत्वाचे आहे , आणि संविधानाने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना समान हक्क दिलेले आहेत . ते आमच्यावर टीका केली म्हणून कोणी हिरावून घेत असेल तर ती दादागिरी आम्ही मोडून काढू . सध्या आम्ही महापालिका आयुक्त यांना मुख्य सभेतील बहुमताच्या जोरावर केलेल्या अशा सर्व ठरावांना निरस्त करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवावे अशी मागणी केली आहे.
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना कोणी धमकी देईल, असे जन्माला आले नाही. त्यांचे चंद्रकांत पाटील किंवा कोणत्याही नेत्यावर आरोप नाहीत. त्यांनी केवळ त्यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. केवळ प्रस्ताव दिल्यावर उत्तर देण्याऐवजी मतदारसंघातील निधी शून्य करणे म्हणजे यात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात मनपा आयुक्तांनाही चौकशीचे लेखी पत्र देण्यात आले आहे. भाजप गटनेते सांगतात की, महायुती मनपात नाही, तर केवळ राज्यात राहील, असेही बालवडकर यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांनी सांगितले की, मागील ४० वर्षांपासून ते मनपात काम करत आहेत आणि असा प्रकार कधी घडलेला पाहिला नाही. शिवस्मारकाला देखील गुंडाळण्याचे काम भाजपने संबंधित मतदारसंघात केले आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नगरसेवकांना मतदारसंघात निधी न देणे म्हणजे अन्याय आहे. केवळ निवडणुकीपुरते मित्र पक्षांचा वापर करणे हे भाजपचे धोरण असल्याचे यातून दिसून येते, असे मानकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रद्द करण्यावरही राष्ट्रवादीचा सवाल
याचबरोबर बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आलेला ₹१.५ कोटींचा निधी शून्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या निर्णयावरूनही राजकीय वातावरण तापले आहे.“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकासाठी मंजूर केलेला निधी रद्द करायचा, हा पुणेकरांच्या आणि शिवप्रेमींच्या भावनांचा अपमान आहे,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला.छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठीचा निधी कोणत्याही परिस्थितीत रद्द करता कामा नये.
शांती नगर येथील बुद्ध विहाराचा निधी ही शून्य करण्यात आला. हे निधी तातडीने पूर्ववत करून विकासकामे मार्गी लावावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आयुक्तांना निवेदन; निधी पूर्ववत करण्याची मागणी
आजच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन —
- अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील रद्द करण्यात आलेला विकास निधी तातडीने पूर्ववत करावा.
- सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील सुमारे ₹११.५ ते ₹१२ कोटींचा निधी इतरत्र वर्ग करण्याचा निर्णय रद्द करावा.
- छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मंजूर ₹१.५ कोटींचा निधी तातडीने पूर्ववत करावा.
- सर्व प्रभागांना विकासाच्या गरजेनुसार समान व न्याय्य पद्धतीने निधी उपलब्ध करून द्यावा.
- राजकीय मतभेदांचा परिणाम सर्वसामान्य पुणेकरांच्या विकासकामांवर होऊ देऊ नये.
अशा मागण्या करण्यात आल्या.
“पुणेकरांच्या हक्काचा विकास निधी कोणालाही राजकीय सूडबुद्धीने रोखता येणार नाही. विकास निधीसाठी आणि पुणेकरांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

