जंतरमंतर आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यासाठी FIRची मागणी; दिल्ली पोलिसांकडून तक्रार गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची माहिती
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. जंतरमंतरवरील आंदोलनात कथित पॅलेट गनच्या माऱ्यात जखमी झालेला विद्यार्थी साहिल लोचव याच्यासोबत राहुल गांधी पोलीस ठाण्यात गेले होते. संबंधित घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र तत्काळ FIR नोंदवली गेली नाही, त्यामुळे राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला बसले.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी याही नंतर या आंदोलनात सहभागी झाल्या. राहुल गांधींसोबत जखमी विद्यार्थ्याची आईदेखील उपस्थित होती. परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाचा संबंध जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाशी आहे. नीट पेपरफुटी आणि परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला.
राहुल गांधी यांनी यापूर्वी संसदेतही या घटनेचा उल्लेख करत आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती. मात्र केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोलिसांकडून गोळीबार झाल्याचा आरोप फेटाळून लावला होता.
जखमी विद्यार्थी साहिल लोचव याने यापूर्वीही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी त्याने वकिलांसह दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याचा दावा आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारेही तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र तपास अधिकाऱ्याचा संपर्क किंवा तक्रारीची पोच मिळाली नसल्याचा आरोप त्याच्या बाजूने करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचा हवाला देत ANIने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रार आधीच सुरू असलेल्या तपासाशी जोडली जाणार आहे. २० जुलैच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणांचा तपास गुन्हे शाखा करत असून, पीडित विद्यार्थ्याची तक्रारही गुन्हे शाखेकडे वर्ग केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
साहिल हा दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्यावर एम्समधील जय प्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जखमी डोळ्याची दृष्टी परत येण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित घटनेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी आणि काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतात पॅलेट गनच्या वापरावर संपूर्ण बंदी नसून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचा वापर विशिष्ट परिस्थितीत आणि मानक कार्यपद्धतीनुसार करण्याची तरतूद आहे. अशा साधनांचा वापर शक्य तितक्या कमी इजा होईल अशा पद्धतीने आणि जमाव नियंत्रणाच्या शेवटच्या पर्यायांपैकी एक म्हणून करण्याची भूमिका अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे विद्यार्थी आंदोलनातील कथित पोलीस कारवाई, पॅलेट गनचा वापर आणि FIR नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

