पुणेः आपल्या घरातील भावाच्या मनगटावर राखी बांधताना देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या जवानांच्या त्यागाची आठवण ठेवत, रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशवासीयांची कृतज्ञता व्यक्त होत आहे. जवानांना सणाच्या दिवशी आपल्या कुटुंबाची उणीव भासू नये आणि देश त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने पुण्यात ‘सैनिक मित्र परिवार’ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने जवानांसाठी लाखो राख्या पाठविण्यात येतात त्यापैकी २१ हजार राख्यांचे पूजन करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे सैनिकांना पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन बाजीराव रस्त्यावरील झांजले विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले होते. खासदार मेधा कुलकर्णी, अतिरीक्त पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, अशोक मेहंदळे, नगरसेविका स्वप्नाली पंडित, कालिंदी पुंडे, प्रा. डॉ. वर्षा तोडमल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहराध्यक्षा स्वाती पोकळे, मनसे महिला शहराध्यक्षा वनिता वागसकर, लायन्स क्लबच्या नीता अगरवाल, नंदा पंडीत, रती पाटील, गायिका सुवर्णा कुलकर्णी, मीना भालिया, प्रतिभा जक्का, वृषाली शेंडे, शीतल अमराळे आदी उपस्थित होते. कल्याणी सराफ, सुनीता शिंदे, रचना झांजले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. सैनिकांसाठी शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे आणि शुभेच्छा संदेश देखील पाठवण्यात आले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राखीचा धागा जरी छोटा असला, तरी त्यामागील प्रेम, आपुलकी, पाठिंबा आणि मातृशक्ती सैनिकांच्या सदैव सोबत असल्याची भावना त्यातून व्यक्त होते. जिथे प्राणीदेखील राहू शकत नाहीत, अशा प्रतिकूल वातावरणात सैनिक दिवस-रात्र देशाच्या सीमेवर पहारा देत असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता ते देशासाठी लढत असतात. सीमेवर तैनात असलेले सैनिक आणि देशातील पोलीस व्यवस्था यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे त्यांच्याप्रती आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे. हे ऋण व्यक्त करण्याची भावना देशवासीयांनी राखीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९८ पासून सरहद्दीवरील सैनिकांना राख्या पाठवल्या जात असून या उपक्रमाला २८ वर्षे झाली आहेत.देशाच्या सीमा भागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये राख्या पाठवल्या जातात तेव्हा त्याची पूजा करून प्रत्येक सैनिकांच्या मनगटावर हा प्रेमाचा धागा बांधला जातो. पुण्यातील सैनिक पुनर्वसन केंद्रात देखील प्रत्यक्ष रक्षाबंधन साजरे केले जाते. त्याचबरोबर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळांमध्ये मूल्य शिक्षणात हा विषय घेतला जात आहे. या उपक्रमास ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, पुण्यातील शाळा व महाविद्यालय यांचा सहभाग असल्याचे ही त्यांनी सांगितले.

