लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Date:

मुंबई, दि. १९ : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांवरील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या मोनिका हरगुडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव रुग्णालयातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, ते लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या व बाबींची पूर्तता करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करताना बांधकाम व इतर सुविधा दर्जेदार असतील, याची दक्षता घ्यावी. रुग्णालय प्रत्यक्ष नागरिकांच्या सेवेत येण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

खेडच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधांना बळकटी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुर्गम तसेच औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. राजगड (वेल्हे) येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारत व आवश्यक पदे मंजूर करण्याची कार्यवाही करावी, चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक पदनिर्मिती करावी, तसेच महाळुंगे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग करावी, असे निर्देश त्यांनी दिले. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे मोठ्या प्रमाणावर असलेले औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता तेथे आरोग्य उपकेंद्रास तातडीने मंजुरी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

खेड तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करावीत, चाकण उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करावी, तसेच खेड-राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात बांधकाम पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी. महानगरपालिकेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थलांतरासंदर्भातील प्रस्ताव, विशेष बाब म्हणून आवश्यक मंजुरी तसेच एएनएम केंद्रांवरील भरतीस परवानगी देण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

बालकांच्या जन्मनोंदणीतील अडथळे दूर करण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात आधार नोंदणी ‘सीआरएस’मध्ये जनरेट होत नसल्यामुळे अनेक बालकांच्या जन्मनोंदणीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर तातडीने योग्य तो तोडगा काढून संबंधित बालकांची जन्मनोंदणी सुरळीतपणे होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून द्या

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य केंद्रांना आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. संबंधित जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.

दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी खेड तालुक्यातील पाईट येथे १०८ रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्ष दिसली पाहिजे

आरोग्य सुविधांशी संबंधित निर्णयांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे. प्रलंबित प्रस्तावांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करून नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने काम करून प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; ‘या’ महिन्यात ओटीटीवर पाहा ट्रेंडिंग मराठी कंटेंट!

मुंबई :- मराठी सिनेमाची खरी ताकद त्यांच्या कथेत आहे. वेगवेगळे...

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी; 30 कठोर अटी

ड्रोन शूटिंगला पूर्ण बंदी; ‘डी-झोन’मध्ये बॅरिकेडिंग, महिला सुरक्षा आणि...