पुणे विमानतळाच्या कार्गो वाहतुकीत मोठी झेप

Date:

पहिल्या आठ महिन्यांत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ

जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान ४५ हजार मेट्रिक टनांहून अधिक कार्गोची हाताळणी

देशांतर्गत कार्गोमध्ये ४३.५ टक्के वाढ; आंतरराष्ट्रीय कार्गो तीन पटींहून अधिक

‘पुण्याच्या औद्योगिक-व्यावसायिक विकासाला बळ देणारी कामगिरी’ : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ४३.९ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील या आठही महिन्यांत कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुणे विमानतळावर ३१,३०३.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी झाली होती. यंदा त्यात तब्बल १३,७४७ मेट्रिक टनांची भर पडून एकूण कार्गो वाहतूक ४५ हजार मेट्रिक टनांच्या पुढे गेली आहे.

महिनानिहाय आकडेवारीतही पुणे विमानतळाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये कार्गो वाहतुकीने सहा हजार मेट्रिक टनांचा टप्पा पार केला. मे महिन्यात सर्वाधिक ६,१४७.८ मेट्रिक टन, तर ऑगस्टमध्ये ६,०४६.८ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली. ऑगस्टमधील वाढ गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत सुमारे ४५.९ टक्के आहे.

देशांतर्गत कार्गो वाहतुकीतही मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील ३१,२४१.३ मेट्रिक टनांवरून यंदा ती ४४,८२२ मेट्रिक टनांवर पोहोचली असून, ही वाढ सुमारे ४३.५ टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीतील वाढ विशेष उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत ६२.४ मेट्रिक टन असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक यंदा २२८.७ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कार्गोची हाताळणी तीन पटींहून अधिक वाढली आहे.

या कामगिरीबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावरील कार्गो वाहतुकीत झालेली भरीव वाढ ही पुणे आणि परिसरातील विस्तारत्या आर्थिक व औद्योगिक क्षमतेचे सकारात्मक निदर्शक आहे. उत्पादन, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माण यांसारख्या उच्च मूल्यवर्धित क्षेत्रांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. या उद्योगांच्या विकासासाठी सक्षम आणि वेगवान एअर-कार्गो कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे.”

“२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व विस्तार आणि परिवर्तन अनुभवले आहे. देशातील विमानतळांची वाढती संख्या, देशांतर्गत आणि प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार तसेच विमान वाहतूक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यामुळे नागरी हवाई वाहतूक क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे आले आहे. या परिवर्तनाचा लाभ पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांनाही होत आहे,” असे मोहोळ यांनी नमूद केले.

“विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकीचे केंद्र न राहता व्यापार, लॉजिस्टिक्स, गुंतवणूक आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र ठरावे, या दृष्टीने केंद्र सरकार विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. पुणे विमानतळावरील कार्गोच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली वाढ ही याच दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची सकारात्मक फलश्रुती आहे,” असेही मोहोळ यांनी सांगितले.

पुणे आणि परिसरात ऑटोमोबाईल, उत्पादन, आयटी, औषधनिर्माण, अभियांत्रिकी तसेच विविध निर्याताभिमुख उद्योगांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे वेळेचे महत्त्व असलेल्या आणि उच्च मूल्याच्या मालवाहतुकीसाठी हवाई कार्गो सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे. पुणे विमानतळावरील वाढती कार्गो वाहतूक स्थानिक उद्योगांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी अधिक वेगाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून वाढत्या गरजांच्या अनुषंगाने पुणे विमानतळावरील प्रवासी तसेच कार्गो सुविधांची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. कार्गो वाहतुकीतील ही सातत्यपूर्ण वाढ महाराष्ट्रातील महत्त्वाचे एव्हिएशन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून पुण्याचे स्थान आणखी मजबूत करणारी ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का...

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम

अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप पुणे,...

राहुल-प्रियांका गांधींची २ तासानंतर सुटका (झुंज : इंदिराजींच्या नातवांची “व्हिडीओ”)

आकाशवाणी भवनातील दीर्घ ठिय्यानंतर पोलिसांची कारवाई; CEC ज्ञानेश कुमारांच्या...