‘ऊर्जा स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती; अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाची कारवाई
पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून पाच महिलांची सुटका केली, तर या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरातील संभाजीनगर येथील ‘ऊर्जा स्पा’ या स्पा सेंटरमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने पडताळणी केली. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आलेल्या पाच महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणात अप्पा दशरथ फसले (वय ४८) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९५/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम १४३(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गोहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-४ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईमुळे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर पुन्हा एकदा पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

