पुणे : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे रविवार, १६ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आले. केशवनगर-खराडी पूल, गोदरेज इन्फिनिटी जवळ, केशवनगर, मुंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी आणि निमंत्रित उपस्थित होते.
या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अॅप्रोच रस्त्याची लांबी ४० मीटर, तर केशवनगर बाजूकडील अॅप्रोच रस्त्याची लांबी १२५ मीटर आहे. पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत २३ कोटी रुपये खर्च झाला आहे. या पुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांना करावा लागणारा सुमारे सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टळणार आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा सुमारे अर्धा तास वेळ वाचणार आहे.
प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरळीत आणि वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी आमदार चेतन तुपे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षनेते नितीन गाडवे, क्रीडा समिती अध्यक्ष नारायण गलांडे, हडपसर-मांजरी प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत तुपे, येरवडा-वडगावशेरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा कविता गलांडे उपस्थित होते.
तसेच स्थानिक नगरसेविका नंदा आबनावे, स्थानिक नगरसेवक डॉ. दादा कोद्रे, स्थानिक नगरसेविका सारिका घुले, स्थानिक नगरसेवक अजित घुले, स्थानिक नगरसेवक शैलजित बनसोडे, स्थानिक नगरसेविका रत्नमाला सातव, नगरसेवक अतुल तरवडे, नगरसेवक उमेश गायकवाड आणि नगरसेवक किशोर धायरकर यांचीही उपस्थिती होती.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांच्यासह महापालिकेचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या उड्डाणपुलामुळे केशवनगर-खराडी मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

