पुणे : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहरात ‘छात्रों की गुंज’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पुणे महापालिकेतील गटनेते तथा नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या पुढाकाराने रविवारी (१६ ऑगस्ट) कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मोहन दादा जोशी, प्रशांत दादा जगताप, सौ. दीप्तीताई चौधरी, अरविंद शिंदे, जयाशेठ किराड, शिवराज मोरे, रफिक भाई शेख, साहिल केदारी, अविनाश साळवे, अश्विनीताई लांडगे, वैशालीताई भालेराव, सौरभ अमराळे, अभिजीत गोरे, ॲड. भाऊसाहेब आजबे, सौ. दिपालीताई डोख, सुनील शिंदे, सौ. शिलाताई राऊत, शिवामंत्री, विशाल मलके, रमेश अय्यर, रविंद्र माझीरे आणि केदार सातपुते यांच्यासह कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ’
बैठकीत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारीमुळे तरुण-तरुणींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थी वर्षभर दिवस-रात्र मेहनत करून सीईटीसारख्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून पेपरफुटी करणाऱ्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पेपरफुटीचे केंद्रबिंदू पुणे असल्याचा दावा करत, अटक करण्यात आलेले प्राध्यापक भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी संबंधित संस्थांशी जोडलेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी जवळपास ५० दिवस लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. मात्र, केंद्र सरकारने लाठीमार, पॅलेट गन आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सपकाळ यांनी केला.
“या केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
‘राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार’
राहुल गांधी देशातील विविध भागांत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. पुण्यात २२ ऑगस्ट रोजी प्रथमच मोठ्या संख्येने महिला विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होणार आहे. ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला सावित्रीच्या लेकींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यार्थी व युवा वर्गाच्या सहभागासाठी व्यापक नियोजन सुरू करण्यात आले आहे.

