काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंचा अपमान करणा-या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना अस्पृश्यता पाळली जाते हे अत्यंत संतापजनक.
पुणे दि. १४ ऑगस्ट २६
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तराखंड येथील हल्द्वानी येथे घेतलेल्या एका सभेनंतर, त्या जागेचे हवन करून शुद्धीकरण करण्यात आले. या विकृत व सडलेल्या मानसिकतेचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा कुटील डाव आहे, पण आम्ही तो हाणून पाडू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्षाने आज राज्यभर आंदोलन करून निषेध केला. पुण्यात बालगंधर्व चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी,अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री, यशोमती ठाकूर, रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार डॉ. विश्वजित कदम, महापालिकेतील गट नेते चंदूशेठ कदम,माजी अध्यक्ष व गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या विचारांनी राज्याभिषेक नाकारला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शेणाचे गोळे व दगड मारले, महामानव डॉ. बाबासाहोब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारला, राजर्षी शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही म्हणणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीला भाजपा आजही खतपाणी घालत आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी घेतलेल्या रॅलीची जागा अशुद्ध झाली या मानसिकतेतून भाजपाच्या बगलबच्च्यांनी हवन केला, ही कृती अत्यंत संताप आणणारी आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र अस्पृश्यता पाळली जात आहे, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

