पुणे | १२ ऑगस्ट २०२६
ई-२० इंधनामुळे वाहनांच्या सुट्या भागांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे सरकारचे तसेच वाहनधारकांचे लक्ष वेधण्यासाठी पुणे युवक काँग्रेसच्या वतीने गुडलक चौक, एफ.सी. रोड येथे अनोखे प्रतीकात्मक ‘श्राद्ध’ आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अक्षय जैन यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान वाहनांचे स्पेअर पार्ट्स, रबरचे भाग, सील, गॅस्केट आदींचे प्रतीकात्मक श्राद्ध करण्यात आले. ई-२० इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या विविध घटकांवर झीज, नुकसान किंवा कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबत वाहनधारकांमध्ये असलेल्या चिंतेकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, हा या आंदोलनाचा उद्देश होता.
या वेळी पूर्व शहर अध्यक्ष दीप्ती चौधरी, पश्चिम अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक अविनाश बागवे, यशराज पारखी, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, आनंद दुबे, भूषण रणभरे, महेश मेहतरे, दिलीपसिंह देशमुख, प्रियांका चौधरी, विश्वजीत जाधव, उमेश खंदारे, अथर्व सोनार, ॲड. अविनाश साळुंके, ओंकार मोरे, आनंद दासा, गोविंद वंजाळे, विक्रांत धोत्रे, सागर धाडवे, यश कोलते, निशांत देशमुख, मोहन चव्हाण, साहिल शिंदे, प्रसनजीत वाघमारे, रोहित साळवे, अनिकेत भांडारे, स्वप्निल गायकवाड, प्रसन्ना मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले :
“ई-२० इंधनाचा निर्णय घेताना केवळ पर्यावरणीय किंवा इंधन बचतीचा विचार करून चालणार नाही, तर सामान्य वाहनधारकाच्या खिशावर होणारा परिणामही सरकारने लक्षात घेतला पाहिजे. लाखो नागरिकांकडे जुनी वाहने आहेत. त्यांच्या वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ झाली, स्पेअर पार्ट्स वारंवार बदलावे लागले किंवा वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला, तर त्याचा थेट आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.”
यावेळी अक्षय जैन म्हणाले :
“आज आम्ही स्पेअर पार्ट्सचे श्राद्ध केले आहे. सामान्य नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले, देखभाल खर्च वाढला आणि त्यांच्या खिशाला कात्री लागायला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? फक्त मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची मागणी कोणीच केलेली नव्हती; हा निर्णय नागरिकांवर लादण्यात आला आहे. ई-२०मुळे मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून येत आहेत. सरकारने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन ई-२०बाबत स्पष्ट धोरण आणि संरक्षणात्मक उपाय जाहीर करावेत.”
यावेळी अविनाश बागवे म्हणाले :
“ई-२० इंधनाचा परिणाम हा केवळ वाहनाच्या इंजिनपुरता मर्यादित विषय नाही, तर तो सामान्य वाहनधारकाच्या आर्थिक बजेटशी जोडलेला आहे. पेट्रोलच्या किमतीसोबतच जर वाहनांची देखभाल, स्पेअर पार्ट्स आणि दुरुस्तीचा खर्च वाढणार असेल, तर त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. सरकारने नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन ई-२०बाबत घाईघाईने निर्णय न घेता तज्ज्ञांशी चर्चा करून ठोस आणि पारदर्शक भूमिका जाहीर करावी.”
ई-२० इंधनामुळे वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून समोर येत आहेत. त्यामुळे सरकारने केवळ ई-२०ची अंमलबजावणी करण्याऐवजी वाहन उत्पादक, ऑटोमोबाईल तज्ज्ञ, मेकॅनिक, स्पेअर पार्ट्स विक्रेते आणि वाहनधारक यांच्याशी व्यापक चर्चा करून स्पष्ट तांत्रिक मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
“आज स्पेअर पार्ट्सचे श्राद्ध केले आहे; उद्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचे आणि त्यांच्या खिशाचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

