‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रभावी, शाश्वत आणि एकात्मिक आराखडा विकसित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाच्या वतीने ‘Small River Rejuvenation Framework’ या विषयावरील प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था (CWPRS), खडकवासला येथे करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, केंद्रीय भूजल मंडळ (CGWB), NEERI, CWPRS, IIT, NIT तसेच विविध राज्यांतील तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
लघु नद्यांचे पुनरुज्जीवन करताना केवळ नदीपात्र स्वच्छ करण्यावर भर न देता संपूर्ण जलसंधारण क्षेत्र, जलस्रोत, भूजल, पर्यावरणीय प्रवाह, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग या सर्व घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
देशभरातील लघु नद्यांच्या संवर्धनासाठी एक समान आणि शाश्वत धोरणात्मक चौकट तयार करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत जल-पर्यावरणीय पुनर्स्थापना, जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, जलसंधारण क्षेत्र उपचार, नदीपाणी गुणवत्ता मूल्यांकन, प्रदूषण नियंत्रण, नदी खोरे व उपखोरे नियोजन, विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया तसेच Nature-Based Solutions या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय धोरणात्मक आणि वित्तीय नियोजन, शासनाची भूमिका, लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था तसेच नागरी समाजाच्या सहभागावरही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील घोड नदीच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव या कार्यशाळेत विशेषत्वाने मांडण्यात आला.
विविध राज्यांतील प्रतिनिधींच्या सहभागातून विषयवार कार्यगट चर्चाही घेण्यात आली. झरे व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यावरणीय प्रवाह, औद्योगिक व घरगुती प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक उपाययोजना आणि नागरी समाजाची भूमिका या विषयांवर कार्यगटांनी विचारमंथन करून शिफारशी सादर केल्या.
कार्यशाळेदरम्यान प्रतिनिधींनी CWPRSमधील विविध जलसंबंधित मॉडेल्सची पाहणी केली. विविध राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नदी पुनरुज्जीवन उपक्रमांतील अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील नद्या आणि जलस्रोतांच्या संवर्धनासाठी एकात्मिक पद्धतीने सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अशा तांत्रिक आणि धोरणात्मक चर्चांचे महत्त्व अधोरेखित केले. लघु नद्यांचे पुनरुज्जीवन हे केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे, तर भविष्यातील जलसुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

