पुणे-
पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरावासाठी आवश्यक जागा तसेच प्रशासकीय परवानग्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुणे महापालिकेच्या महापौर सौ. मंजुषानागपुरे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा अभिमान आहे. ढोल-ताशा पथके या परंपरेचा अविभाज्य भाग असून, हजारो युवक-युवती शिस्त, संस्कार आणि सांघिक भावनेतून या लोककलेचे जतन व संवर्धन करीत आहेत. “पुण्याची ही सांस्कृतिक ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ढोल-ताशा पथकांना प्रोत्साहन आणि आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे,” असे महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने नदीपात्र, महापालिकेची मोकळी मैदाने तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा योग्य ठिकाणी ढोल-ताशा पथकांना सरावासाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना महापौरांनी केली आहे.
तसेच विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घेण्यासाठी पथकांना अडचणी येऊ नयेत यासाठी ‘सिंगल विंडो’ प्रणाली किंवा सुलभ ऑनलाइन/ऑफलाइन परवानगी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. सरावाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रकाशव्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करावी.
ढोल-ताशा सरावादरम्यान ध्वनीप्रदूषण, वेळेची मर्यादा आणि वाहतुकीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी महापालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्याचवेळी सांस्कृतिक परंपरेलाही प्रोत्साहन मिळेल, यामध्ये योग्य समतोल साधणे आवश्यक आहे.
“पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशा परंपरेला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करून सराव करणाऱ्या पथकांना प्रशासनाकडून अडथळे न येता आवश्यक सुविधा आणि परवानगी मिळावी. यासाठी संबंधित विभागांना तातडीने योग्य ते निर्देश देण्यात यावेत,” अशी भूमिका महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अधिकृत ढोल-ताशा पथकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय न होईल अशा पद्धतीने सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.

