महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन, विद्युत पोल स्थलांतर आणि रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
पुणे : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) पथ विभागाकडील विविध महत्त्वाच्या रस्ते कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम चौकातील नियोजित उड्डाणपूल आणि वडगाव येथील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील सर्व्हिस रोड या कामांचा समावेश होता.
दक्षिण पुण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादनाअभावी २०१७-१८ पासून रखडला होता. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर भूसंपादन प्रक्रियेला गती दिल्याने या रस्त्याच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाला असून आता रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
रस्ता विकासात अडथळा ठरणारे विद्युत पोल आणि ट्रान्सफॉर्मर एका आठवड्यात स्थलांतरित करण्याचे आदेश विद्युत विभागाला देण्यात आले. ट्रान्सफॉर्मरसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मालमत्ता व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या आहेत.
दहा मिळकतींचे भूसंपादन अजून बाकी
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी अद्याप दहा मिळकतींचे संपादन बाकी असल्याने रस्त्याचे सलग काम करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे या जागांचे तातडीने भूसंपादन करण्याचे निर्देश आयुक्तांनी विशेष भूसंपादन अधिकारी आणि भूसंपादन विभागाच्या उपायुक्तांना दिले आहेत.
रस्ता विकासातील अडथळ्यांची नकाशासह माहिती तयार करून संबंधित विभागांकडून पूर्तता करून घेण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेशही नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राजस चौकातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत NHAIशी चर्चा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राजस चौकात उतरणाऱ्या उड्डाणपुलासाठी महापालिकेने पूर्ण केलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
उड्डाणपूल आणि कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून सासवडकडे जाणारी-येणारी जड वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा महापालिकेचा अंदाज आहे. तसेच माऊलीनगर, शेलारमळा, उत्कर्ष सोसायटी, राजस चौक आणि गोकुळनगर परिसरातील वाहतुकीलाही ग्रेड सेपरेटरचा फायदा होणार आहे.
गंगाधाम उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे आदेश
गंगाधाम चौकातील नियोजित उड्डाणपुलाच्या ठिकाणी पाहणी करून काम तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चौकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी कलम २०५ अंतर्गत प्रक्रिया सुरू असून, काही मिळकतदारांनी जागा ताब्यात न दिल्याने त्यांच्याशी चर्चा करून तडजोडीने जागा ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले.
हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास मार्केट यार्ड ते कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
नवले पुलाजवळील २०० मीटरचे रखडलेले काम मार्गी लावण्याचे निर्देश
वडगाव येथील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडचीही पाहणी करण्यात आली. स्वर्ण हॉटेल ते कुदळे कमान या दरम्यानचे सुमारे २०० मीटरचे काम रखडलेले असून संबंधित जागामालकाशी चर्चा करून किंवा तडजोडीने जागा ताब्यात घेऊन हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
हा रस्ता विकसित झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनांची ये-जा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त अरविंद माळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

