‘कचऱ्यावर पोसलेला भूमिग्रीनचा हत्ती पोसू नका’; स्थायी समिती सभागृहाबाहेर अरविंद शिंदेंचे आंदोलन

Date:

₹९६७ प्रतिटन दर स्वीकारल्याने सात वर्षांत पुणेकरांचे सुमारे ₹५०० कोटींचे नुकसान होणार असल्याचा आरोप; निविदा रद्द करून स्वतंत्र ओला-सुका कचरा निविदांची मागणी

पुणे, ता. ६ : पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा प्रक्रिया निविदेत मोठी आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करीत काँग्रेसचे नेते, वरिष्ठ नगरसेवक तथा माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी गुरुवारी स्थायी समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर आंदोलन केले. ‘कचऱ्यावर पोसलेला भूमिग्रीन कंपनीचा हत्ती पोसू नका’, असा फलक हातात घेऊन त्यांनी प्रशासनाच्या निविदा प्रक्रियेचा निषेध केला.

ओला कचरा प्रक्रिया, सुका कचरा प्रक्रिया आणि संमिश्र कचरा प्रक्रिया या कामांसाठी कोणतेही अधिकृत शासकीय दरपत्रक अर्थात डीएसआर उपलब्ध नसताना प्रशासनाने निविदेचा दर कशाच्या आधारे निश्चित केला, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. निविदा क्रमांक ३/२०२६-२७ मध्ये भूमिग्रीन कंपनीने प्रतिमेट्रिक टन ९६७ रुपये दर सादर केला. वाटाघाटीनंतर हा दर ७०० रुपयांपर्यंत कमी केला असला, तरी तो व्यवहार्य दरापेक्षा सुमारे २५० रुपये जास्त असल्याचा त्यांचा आरोप आहे.

तज्ज्ञांच्या मते ओला आणि सुका कचरा प्रक्रियेसाठी स्वतंत्र निविदा मागविल्या असत्या, तर प्रतिमेट्रिक टन जास्तीत जास्त ४०० ते ४५० रुपये दर मिळू शकला असता. मात्र, प्रशासनाने संमिश्र पद्धतीने निविदा काढून अधिक दर स्वीकारल्याने सात वर्षांच्या करारकालावधीत करदात्या पुणेकरांचे सुमारे ५०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजप आमदाराच्या दबावाचा आरोप

प्रशासनावर राजकीय दबाव आणून संमिश्र कचरा प्रक्रियेची निविदा राबविण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी आंदोलनादरम्यान केला. भाजपच्या एका आमदाराच्या दबावामुळे प्रशासनाने स्वतंत्र निविदांऐवजी भूमिग्रीन कंपनीच्या फायद्याची निविदा प्रक्रिया पुढे नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपलब्ध व्हिडिओमध्ये संबंधित आमदाराचे नाव स्पष्टपणे ऐकू न आल्याने ते येथे नमूद करण्यात आलेले नाही.

देशभरात संमिश्र पद्धतीने कचरा प्रक्रिया करणारे केवळ चार ते पाच मोठे ठेकेदार आहेत. या ठेकेदारांनी विविध महानगरपालिकांची कामे आपापसात वाटून घेतली असून, एका महापालिकेत भरमसाठ दराने निविदा मिळवून तोच दर इतर महापालिकांसाठी पायाभूत दर म्हणून वापरण्यात येत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

दक्षता विभागाच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष?

पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाने ओला आणि सुका कचरा प्रक्रियेसाठी स्वतंत्र निविदा मागविण्याचा लेखी अभिप्राय महापालिका आयुक्तांना दिला होता. मात्र, या अभिप्रायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संमिश्र पद्धतीची निविदा राबविण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

शिंदे यांच्या प्रमुख मागण्या

निविदा क्रमांक ३/२०२६-२७ तात्काळ रद्द करावी. सीओईपी, आयआयटी किंवा व्हीआयटीसारख्या तज्ज्ञ संस्थेमार्फत ४५ दिवसांच्या आत अधिकृत डीएसआर तयार करावा. त्यानंतर डीएसआरच्या आधारे ओला आणि सुका कचरा प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे बी-१ पद्धतीने निविदा मागवाव्यात, अशी मागणी शिंदे यांनी केली.

दक्षता विभागाच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांची चौकशी करावी. तसेच निविदेशी संबंधित पुढील सर्व कार्यवाहीतून अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला वगळून सर्व निर्णय थेट महापालिका आयुक्तांच्या स्तरावर घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

करदात्या पुणेकरांच्या पैशांचे नुकसान करणारी निविदा मंजूर करू नये आणि स्थायी समितीने भूमिग्रीन कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता देऊ नये, अशी भूमिका घेत शिंदे यांनी सभागृहाबाहेर आंदोलन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिनाभरात सर्व भूसंपादन प्रकरणांचा आराखडा सादर करा

न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचे श्रीनाथ...

खड्ड्यांची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी; महिला-बालकल्याण योजनांसाठी उत्पन्न मर्यादा अडीच लाख

पाऊस कमी होताच रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे निर्देश; उत्पन्न...

३६ देशांतून २७४ फरार आरोपी भारतात; १८ हजार ७६२ कोटी रुपये परत मिळवल्याचा केंद्राचा दावा

२०१९ ते जुलै २०२६ दरम्यान प्रत्यार्पण आणि अन्य प्रक्रियेतून...