‘बाजीराव पेशवे सन्मानचिन्हाचे’ अनावरण; इतिहास संवर्धनासाठी युवकांच्या सहभागावर भर
पुणे, दि. ३ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याचे वैभवशाली सेनापती श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व व रील (Reel) स्पर्धांचा शुभारंभ आज अमृत मुख्यालय औंध येथे संपन्न झाला. यावेळी ‘बाजीराव पेशवे सन्मानचिन्हाचे’ अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील संकल्पना व उद्दिष्ट स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी नरेंद्र पाटील यांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. तर गोविंदराव कुलकर्णी यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या विचारांचा व कार्याचा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रम, युद्धनीती, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारातील ऐतिहासिक योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. इतिहास हा केवळ घटनांचा संग्रह नसून राष्ट्राला दिशा देणारा प्रेरणास्रोत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘बाजीराव पेशवे सन्मानचिन्हाचे’ अनावरण करण्यात आले. या सन्मानचिन्हातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा, पराक्रम आणि स्वाभिमानी नेतृत्वाचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले.
प्रास्ताविकात व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी म्हणाले, इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून व्यक्तिमत्त्व घडविणारा आणि समाजाला दिशा देणारा प्रेरणास्रोत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धैर्य, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि विजिगीषू वृत्ती आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून आधुनिक डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने हा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व व रील स्पर्धांचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. इतिहासाचा अभ्यास केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित न राहता समाजमाध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने यंदा प्रथमच रील स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक व युवकांना आपल्या कल्पकतेतून इतिहास नव्या स्वरूपात सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

