नवी दिल्ली- गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटीसाठी त्यांना जबाबदार धरत जंतर मंतरवर ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही दुसरे काहीही स्वीकारणार नाही, असे आंदोलकांनी म्हटले होते.
प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल दीपक म्हणाले, “लोक म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए.” दीपक म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. जर तुम्ही घाबरत नसाल, जर तुम्ही या सरकारपुढे झुकत नसाल, तर तुम्ही कोणाचाही राजीनामा घेऊ शकता, याचा हा पुरावा आहे. लोकशाहीत घाबरण्याची गरज नाही.”
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा पत्रातील शब्द जसाच्या तसा
मी गेल्या 4 दशकांहून (40 वर्षांहून) अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिलो आहे. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच एका सशक्त राष्ट्राचा पाया असते, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारताच्या युवा पिढीची स्वप्ने पूर्ण करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिलेला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो.
परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेमध्ये काही गैरव्यवहार आणि अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवली, ही परीक्षा रद्द केली आणि पुन्हा परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा CBT (संगणकावर आधारित परीक्षा) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण काळात, २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, हीच आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने एकत्र येऊन (Whole of Government Approach) काम केले. यामध्ये केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारे आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळे २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले
पहिल्या दिवसापासूनच मी या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही पळ काढला नाही. कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचे भविष्य परीक्षा माफियांच्या मुळे खराब होऊ देणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असा माझा ठाम संकल्प होता. १६ जुलै रोजी जाहीर झालेले NEET-UG चे निकाल समाधानकारक राहिले, ज्यामध्ये गरीब घरातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना यश मिळाले. परंतु, या काळातही काही जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भडकवण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझे मन अत्यंत दुःखी झाले. मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर दृढ विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि तरुणांच्या स्वप्नांचा व अपेक्षांचा आदर करतो. तरुण हे केवळ भारताचे भविष्य नाहीत, तर नव्या आणि विकसित भारताचे निर्माते आहेत. गेल्या १० दिवसांतील घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही.
युवाशक्तीला गैरसमजाच्या चक्रात अडकू देणार नाही
भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. या युवाशक्तीला गैरसमजाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे. मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनापासून आभार मानतो. तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, त्या सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी सदैव समर्पित राहीन. प्रभू श्री जगन्नाथांच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणांच्या सेवा व स्वप्नपूर्तीसाठी सदैव तत्पर राहीन.

